माजी मंत्री आणि आमदार गणपतराव देशमुख यांनी वयाच्या 94 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
तत्वनिष्ठ, थोर तपस्वी नेतृत्व काळाच्या पडद्याआड..
मुंबई : सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे (Sangola Assembly constituency) माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय,सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे.
विविध पक्षाच्या नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना बोलून दाखवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष
शरद पवार यांनी त्यांच्या कार्याला , आठवणीला ऊजाळा दिला आहे व श्रध्दांजली वाहीली.
कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला - शरद पवार
गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शोक भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे.
महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल अशा शब्दात त्यांच्या कार्याचे वर्णन शरद पवार यांनी केले आहे.
लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.