लोकहित न्यूज ,बारामती
पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बारामती, 30 मार्च : बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे वय 45, हे आपले ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून शेतावर फवारणीचे (टू फोर्टी) औषध प्राशन केले. दराडे यांना थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना, मी हे औषध प्यायलो आहे,असे सांगितलं. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्यांना लगोलग उपचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .
दराडे यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील अकोले हे असून त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि सर्वांना विश्वासात घेऊन ते काम करत असत. दराडे यांना दोन मुले पत्नी असून त्यांनी पोलीस सेवेत 24 वर्ष आपली सेवा बजावली आहे.
पुणे शहर , देहूरोड, इंदापूर ,बारामती शहर व गेली पाच वर्ष ते बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.