लोकहित न्यू्ज, मुंबई दि 21/05/2022
संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढण्यावर ठाम असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे . संभाजीराजेंनी शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभेची निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता अपक्ष निवडणूक लढवण्यावर संभाजीराजे ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाही ; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते.
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीतील उमेदवारीचं गणित ठरत नव्हते. मात्र, आपल्याला पाठिंबा मिळावा, यासाठी स्वतः संभाजीराजेंनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
दुसरीकडे, मराठा संघटनांनी संभाजीराजेंना शिवसेनेसह सर्वच पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यात येत होत्या. त्यामुळे संभाजीराजे शिवसेनेच्या तिकीटावर लढणार की, सगळ्यांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, आता या चर्चांना जवळजवळ पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. संभाजीराजे हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सूत्रांकडून कळते. शिवसेना पक्षाच्या तिकीटावर राज्यसभेची निवडणूक लढा या प्रस्तावाला संभाजीराजेंचा विरोध असून, अपक्ष लढण्यावर ते ठाम आहेत, असे समजते.