धनशक्तीचा विजय असल्याची स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्याची टिका .हा जनतेच्या पाठींब्याचा विजय – आवताडे
लोकहित न्यूज पंढरपूर दि.02/05/2021
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो’ असं आवाहन केलं होतं.
अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.
सुरुवातीपासुनच आवताडे यांनी आघाडी घेतली होती ती तब्बल 38 फेर्या पूर्ण होई पर्यंत कायम होती. शेवटी भाजपाची रणनिती यशस्वी ठरली असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला. हा विजय माझा नसून सबंध जनतेचा आहे ,जनतेने आमच्या वर ठेवलेला विश्वास व दिलेला पाठींबा याचे विजयात रुपांतर झाले.