लोकहित न्यूज दि 07/10/2023
मांजरी परिसरातील आपण मूलभूत सुविधेपासून वंचित आहोत तर विकास कधी साध्य होणार. प्रगती करायची असेल तर पर्याय निर्माण करावा लागेल.
सजग नागरिकामार्फत अराजकीय असलेली मांजरी बुद्रुक विकास समितीची स्थापना व्हावी.
रोखठोक समाज प्रबोधनपर लेख
लेखक नितीन जाधव.
पुणे शहर हे वेगाने वाढणारे सातवे महानगर असून देशात अव्वल स्मार्ट सिटी म्हणून गणली जाते त्यातलाच मांजरी बुद्रुक हा एक भाग आहे. मात्र या गावात कित्येक वर्षापासून मुलभूत सुविधा नाहीत तर विकास कसा साध्य होणार. स्मार्ट सिटी चा भाग होऊन प्रगती करायची असेल तर पर्याय निर्माण करावा लागेल. प्रशासनाला जाब विचारणारी व ठणकावून काम करून घेणारी अराजकीय मांजरी बुद्रुक विकास समितीची स्थापना होणे आवश्यक झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत चा विचार केला तर प्रशासनाने नागरिकांना गृहीत धरलेले आहे वेळेत सर्व प्रकारचे कर भरा आणि व्यवस्थित सुविधा नसतानाही हे सर्व काही सहन करा. घरपट्टी, आरोग्य कर. कचरा निर्मूलन शुल्क, स्वच्छता कर, पाणीपट्टी,दिवाबत्ती कर, पथ कर. या सर्वांचा भरणा वेळेत करा अन्यथा मांजरी तील नागरिकांना दंड नोटीसा दिल्या जातात तर मग मांजरी बुद्रुकच्या च नागरिकांना सुविधा का देत नाहीत? आपल्याकडे प्रश्न विचारणारे आणि ठणकावून काम करून घेणारेच कोणी असल्याचे दिसत नाही याचाच संबंधित मंडळी फायदा घेत असल्याचे दिसते.
रखडलेला रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न, मुळा मुठा नदीवरील होणारा अरुंद पूल, उड्डाणपूल ते नदीपर्यंत रडतखडत सुरू असलेला चार पदरी रस्ता, कित्येक वर्षापासून रखडलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न? यापैकी एकही गोष्ट प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही.
कित्येक वेळा सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले, विविध पक्षाने वैयक्तिक स्तरावर आंदोलन केले, मांजरी बुद्रुक बॅनरखालीही सजग ग्रामस्थ मार्फत वेगळे आंदोलन करण्यात आले पदरात काय पडले तर अर्धवट काम . सर्व सुरळीत होऊन गाव विकासाच्या प्रवाहात येईल म्हणून लय वेळा कबड्डी खेळली, विठी दांडू सुद्धा खेळला, सामाजिक राजकीय ताकद सुद्धा सर्वांनी लावली तरीसुद्धा सर्वच संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी, महापालिका,पीएमआरडीए या संस्था मांजरी बुद्रुक येथील मूलभूत सुविधांसाठी दुर्लक्षच करीत आहेत.
मात्र सदरच्या ठिकाणी दुसऱ्या अंगाने विचार केला तर अविकसित मार्केट असताना सुद्धा जागेचे भाव , सदनिकांचे दर, व्यापारी संकुलांचे भाव जास्तीचेच आहेत परिणामी व्यापारी लघुउद्योजक ,उच्च मध्यमवर्गीय समाज मांजरी बुद्रुक कडे आकर्षिला जात नाही त्यामुळे अनेक स्थानिक नव उद्योजकांना तोटा सहन करावा लागत आहे . आपण असंच सहन करत बसलो तर प्रशासन आपली कामे वेळेत करेल असे वाटत नाही. अनेक वेळा दैनिकात येणाऱ्या बातम्या , विविध पक्षा मार्फत दिली जाणारी निवेदने, धरणे आंदोलने करून आपण प्रशासनाला जागृत केले आहे परंतु आपणास अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. याचसाठी एक पर्याय व्यवस्था म्हणून अराजकीय असणारी मांजरी विकास समितीची स्थापना करावी असे मला वाटते.
त्यामध्ये गावातील प्रत्येक पक्षाचे तीन प्रतिनिधी, सामाजिक संस्थेचे दोन प्रतिनिधी, सांस्कृतिक, धार्मिक संघटनेचा एक प्रतिनिधी, समाज सुधारक, विचारवंत. पत्रकार.वकील.डॉक्टर .उद्योजक, अभियंते. रस्ते वीज पाणी क्षेत्रातील अनुभवी एक एक तज्ञ अशा पद्धतीने किमान 50 अभ्यासू मान्यवरांची एक समिती निर्माण व्हावी. या समितीने मांजरी बुद्रुक गावच्या विकासासाठी योगदान द्यावे वर्षानुवर्षे सुरू असलेली अर्धवट कामे,शासन दरबारी अडकून पडलेल्या योजना, प्रशासन जाणून बुजून करत असलेली डोळेझाक, व इतर संबंधित विषयांमध्ये समिती सातत्याने पाठपुरावा करेल व संबंधित खात्यामार्फत अधिकाऱ्यामार्फत ठरलेल्या वेळेत काम करून घेण्यास भाग पाडेल असा सर्वसाधारण विचार आहे.
सध्या ग्रामपंचायत ही नाही तसेच स्थानिक नगरसेवक ही नाहीत आताचा सर्व कारभार प्रशासकाच्या हाती आहे त्यामुळे हक्काने कोणत्या लोकप्रतिनिधीला आपण कामासंबंधी विचारायचे हा पण प्रश्न आहे. त्यातच गाव महापालिकेत गेल्यामुळे अडचणी जास्तच वाढले आहेत. रखडलेले रस्ते ड्रेनेज दिवाबत्ती उड्डाणपुलाची कामे पिण्याच्या पाण्याची योजना आधी विषय लवकर मार्गी लागावेत व मांजरी बुद्रुक गाव विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जनतेनेच पर्यायी यंत्रणा उभी करावी लागेल त्याचाच एक भाग म्हणून मांजरी बुद्रुक विकास समिती कार्य करेल असा मला मनापासून विश्वास वाटतो.
हे सर्व सांगण्यामागे लिहिण्यामागे कोणताही सामाजिक राजकीय वैयक्तिक द्वेष नसून आपल्या भागाची परिसराची प्रगती भरभराट व्हावी सामान्यांसह सर्वांनाच योग्य वेळेत लाभ आणि न्याय मिळवा हीच भावना आहे. सध्या सर्व दूर गाजत असलेला मांजरी बुद्रुक चा अर्धवट विकासाचा पॅटर्न धुळीस मिळून परिपूर्ण प्रेरणादायी मांजरी बुद्रुक विकास पॅटर्न म्हणून उदयास येईल यात मात्र मला शंका वाटत नाही.
माझा समाजप्रबोधन पर लेख आवडल्यास आपण आपले मत नोंदवा अथवा थेट संपर्क करा.
लेखक.नितीन जाधव
मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ.मुंबई.
मो 9326398001