लोकहित न्यूज,मांजरीबु विशेषवृत्त दि 9/08/2023
ग्रामस्थांमार्फत मांजरीबु उड्डाणपुलाचा एक पदर हलक्या वाहनांसाठी खुला, मी मांजरी कर समूह ग्रामस्थांतर्फे सुरेश घुले यांचा सत्कार
संपूर्ण उड्डाण पुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी मांजरीकर या बॅनरखाली सजग ग्रामस्थांच्या समूहातर्फे उड्डाणपुलाचा एक पदर खुला करण्यात आला आहे.
तब्बल पाच वर्षाहून ही अधिक काळ लोटला असल्याने नोकरदार,कामगार. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,ग्रामस्थ,व्यावसायिक,उद्योजक,सामान्य नागरिक संपूर्ण रस्ता बंद असल्यामुळे त्रास सहन करत होते.
रेल्वे प्रशासन,सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नेमलेले ठेकेदार राजकीय नेत्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना तारीख पे तारीख देत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
संपूर्ण पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखीन विलंब लागत असल्याने सामाजिक भावनेतून मांजरी ग्रामस्थ तर्फे मी मांजरीकर या सजग नागरिकांच्या समूहाकडून केवळ हलक्या वाहनांसाठी उड्डाणपुलाचा एक पदर सुरू करण्यात आला आहे.
हा रस्ता मालवाहू गाड्या, ट्रक,टेम्पो, डंपर आदी अवजड वाहनासाठी बंद असणार आहे . या ठिकाणी केवळ दुचाकी, तीन चाकी रिक्षा, चार चाकी गाड्या या पुलावरून सोयीस्कररित्या प्रवास करू शकतात. मालवाहतूक करणारी व अधिक उंचीची अवजड वाहने यांना हा पूल वापरता येणार नाही उपाययोजना म्हणून उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारावर साडेसात फूट उंचीचे लोखंडी बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत.
संपूर्ण उड्डाणपूल सुरु व्हावा म्हणून सर्व पक्षामार्फत अनेक वेळा रस्ता रोको,रेल रोको,विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली परंतु संपूर्ण पुलाचे काम लवकर होऊ शकले नाही.
आमदार,खासदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अनेकांनी ग्रामस्थांना आश्वासित केले होते परंतु काम पूर्णत्वाला जात नव्हते.
याच कारणासाठी गावकऱ्यांना व परिसरातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळावा या हेतूने मी मांजरीकर या बॅनरखाली गावातील समस्त युवकांनी सजग नागरिकांनी एकत्र येत सामाजिक भावनेतून सदरचा उड्डाणपुलाचा एक पदर सोयीसाठी वाहतुकीस खुला केला आहे.
हलक्या वाहना साठी एक पदर खुला करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले, राष्ट्रवादी पुणे जि.पदवीधर चे अध्यक्ष निलेश (बंटी ) घुले व त्यांच्या टीमने पुढाकार घेतला.
मी मांजरीकर या बॅनरखाली सर्वांनी एकत्रित येत सर्वपक्षीय,संघटना विरहित, सामाजिक हेतू जपत सदरची वाहतूक सुरू केली. परिसरातील नागरिकांना व ग्रामस्थांना सदरच्या विषयाची माहिती व्हावी यासाठी मी मांजरीकर मार्फत छोटा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. उड्डाणपूल लवकर सुरू व्हावा या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार चेतन तुपे व खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडे सुरेश घुले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे युद्ध पातळीवर काम करून घेण्यात आले, ग्रामस्थांच्या वतीने सुरेश घुले यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले मुख्य सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते तसेच माजी सरपंच बापूसाहेब घुले, शैलेश घुले,संजय घुले,दीपक घुले, प्रवीण घुले,अजित घुले, निलेश घुले व ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सुरेश घुले व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.