लोकहित न्यूज ,मुंबई दि.9 डिसेंबर 2020
संभाजीनगरसाठी १६८० कोटींची पाणी पुरवठा योजना,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ
पालकमंञी सुभाष देसाई यांची माहिती
संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने मंजूर केलेल्या महत्वाकांक्षी अशा १६८० कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन शनिवारी (दि. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी उपस्थिती राहणार आहेत.
संभाजीनगर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून पाईपलाइन टाकली जाणार आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कोविडमुळे या कामांचे उद्घाटन रखडले होते. परंतु आता त्याला गती मिळणार आहे. शनिवारी दि. १२ रोजी गरवारे स्टेडियम परिसरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. याबरोबर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी मंजूर
संभाजीनगर शहरातील व चिकलठाणा एमआयडीसी परिसरात एकूण २३ रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी शासनाने १५२.५८ कोटी रुपये मंजूर केले आहे. महानगरपालिका, एमआयडीसी, रस्ते विकास महामंडळ यांच्यातर्फे रस्त्याची कामे केली जाणार आहे. MSRDC यांना रक्कम रु.५१.७६ कोटी (एकूण ०७ रस्त्यांसाठी ६.८१ कि.मी करिता), MIDC यांना रक्कम रु.५०.०४ कोटी (एकूण ०७ रस्त्यांसाठी ८.७९ कि.मी करिता) व औरंगाबाद महानगरपालिकेस रक्कम रु. ५०.५८ कोटी (एकूण ०९ रस्त्यांसाठी१०.०२ कि.मी करिता) कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून निश्चित केले आहे. महानगरपालिकातर्फे करण्यात येणाऱ्या एकूण ०९ रस्त्यांच्या कामाकरिता शासन निर्णयानुसार तृतीय पक्षतांत्रिक लेखा परीक्षणाकरिता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकातर्फे रोडच्या कामाकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून रोडचे काम लवकरच सुरु होणार आहे.