लोकहित न्यूज.मुंबई विशेष वृत्त दि 18/01/23
दावोसमधून महाराष्ट्रात १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक
एक लाख रोजगार निर्माण होणारः उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती..
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाने विविध कंपन्यांसोबत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे गुंतवणूक करार करत ऐतिहासिक कामगिरी केली. याद्वारे राज्यात १ लाख रोजगार निर्माण होईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सामंत म्हणाले की, दावोसमध्ये भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यासाठी किती कोटींचे सामंजस्य करार करणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानुसार आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली. महाराष्ट्रातून आल्यानंतर जर्मनीतील काही कंपन्यांना आम्ही भेट दिली. त्यांनी राज्यात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची हमी दिली.
या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पॅव्हिलीयनमध्ये ३० तास वेळ दिला. दोन दिवसांत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. यातून एक लाख रोजगार निर्माण होणार आहे. जे सामंजस्य करार झाले त्यामध्ये बर्कशायर हाथवे, अमेरिका १६ कोटींची गुंतवणूक करणार आहे. बोकोरो इंडिया प्रा. लि. कंपनी पाच हजार कोटींचा चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. ग्रीनको सोलार आणि हायड्रो प्रकल्पात १२ हजार कोटी, आयसीडी मेडिकल टेक्निकल कॅपिटल-१६ हजार कोटी, महिंद्रा इलेक्ट्रिकल्स इव्ही क्षेत्रांमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असून त्यासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. न्यू इरा गॅसिफिकेशन विदर्भातील चंद्रपूरमध्ये २० हजार कोटी, निप्पॉन २० हजार कोटी, लक्सेमबर्ग डेटा सेंटरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यावेळी बार्कलिन विद्यापीठासोबत कौशल्ये विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
कोकणात उद्योग यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्टील प्रकल्पाचे पीतामह मित्तल यांची भेट घेतली. त्यांनी कोकणात प्रकल्प उभारण्याबाबत विनंती केली. बंदर विकासाचे प्रकल्प सुरू करण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला.
दावोस परिषदेत लेक्समबर्गचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना भेटले, सिंगापूर, सौदी अरेबियाचे मंत्री भेटले. विविध शिष्टमंडळाची यावेळी बैठक घेतली. त्यांनी विविध क्षेत्रात गुंतवणुकीची तयारी दर्शवली. मेडिकल डिव्हाईस पार्क उभारण्याची तयारी दर्शविण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांच्या ३० तासांच्या दौऱ्यात महाराष्ट्राला उद्योग जगतात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मागच्या वर्षापेक्षा चार पट सामंजस्य करार केले आहे. जे करार झाले आहेत, ते प्रत्यक्षात येतील. मागच्यावर्षी ३० हजार कोटींचे करार झाले होते. त्यांची किती प्रमाणात अमंलबजावणी झाली, हे स्पष्ट अद्याप होत नाही. राज्याचा सर्व भाग उद्योगांनी व्यापला पाहीजे, हे आमचे उद्दीष्ट आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
याचदरम्यान, आध्यात्मिक गुरु श्री. श्री रवीशंकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.
हे सरकार राज्याला उच्च पातळीवर घेऊन जाईल,तसेच
सेमी कंडक्टरचे इतर प्रकल्प महाराष्ट्रात येतील, असेही सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील युवा पीढीचे स्वप्न साकारणे हेच शिंदे- फडणवीस सरकारचे काम आहे, असे सामंत म्हणाले.