कोविड प्रतिबंधात्मक लस ४५ वर्षांवरील सर्वांना देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य
मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार
लोकहित न्यूज, मुंबई दि.23 मार्च 2021
देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत (दि. २२ मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.