लोकहित न्यूज. पुणे दि 15/06/2022
अण्णासाहेब मगर विद्या मंदिर मांजरी खुर्द येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत
मांजरी खुर्द ता.हवेली येथील आण्णासाहेब मगर विद्यालयात पहिल्या दिवशी ता. 15 जुन रोजी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.राष्ट्रगीताने व विद्येची देवता सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशोक आव्हाळे व डॉक्टर शिवदीप उंद्रे यांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले.
सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प, चॉकलेट ,वह्या, पुस्तके आणि दप्तर,पट्टी,पेन,पेन्सिल,खोडरबर इत्यादी शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हवेली पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष.अशोक आव्हाळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. शिवदीप उंद्रे हे होते तसेच प्रगतीशील शेतकरी सुनिल किसन उंद्रे, दत्तात्रय उंद्रे ,बाळासाहेब तुकाराम गरुड, लता सावंत ,निलेश कडू इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.
अशोक आव्हाळे व डॉक्टर शिवदीप उंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना जीवनात जर मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर केवळ इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनच करता येते असे नाही तर मराठी माध्यमाच्या शाळेत मातृभाषेतून शिक्षण घेऊनही तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता हे स्वतःच्या अनुभवातून सिद्ध करून सांगितले. मराठी माध्यमातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनिअर,उद्योजक घडले आहेत.
अण्णासाहेब मगर विद्या मंदिर मांजरी खुर्द या शाळेतही सुसज्ज इमारत ,भव्य क्रीडांगण ,स्वतंत्र संगणक, कक्ष प्रोजेक्टर , लॅपटॉप – टॅब व ई-लर्निंग ची सुविधा इत्यादी भौतिक सुविधा उपलब्ध असून येथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात मोठ्या पदावर नोकरी – व्यवसाय , आयटी क्षेत्रात तसेच इंजीनियरिंग ,डॉक्टर, वकील, प्राध्यापक इत्यादी क्षेत्रात माजी विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडविले आहे असे अशोक आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. आपण मराठी शाळेत कसे शिक्षण घेतले, त्यावेळची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती काय आहे, आपल्याला आलेले अनुभव सांगत मुलांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न आव्हाळे यांनी केला.
याप्रसंगी श्री नाथ नर्सरी चे मालक केतन सुनीलभाऊ उंद्रे यांनी मुलांसाठी पाचशे वह्या भेट दिल्या तसेच तुषार बाळासाहेब गरुड यांनी शाळेला लोखंडी दरवाजे बसवण्यासाठी 50 हजार रुपये देणगी देऊ केलेली आहे.
यावेळी मुख्याध्यापक ठाकरे सर, शाळेचे शिक्षक, महिला शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडाशिक्षक अनिल चंद यांनी केले तर मराठी विभागाचे ज्येष्ठ शिक्षक .विठ्ठल ढमे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.