लोकहित न्यूज,मंञालय ,मुंबई. दि.2/02/2022
महा आवास योजनेला गती द्या !
राज्यातील विविध योजनांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
गौण खनिज व महसूल वसुलीचाही घेतला आढावा
खोटे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
कामांच्या ठिकाणी राज्यमंत्री सत्तार करणार सरप्राईज व्हिजिट
आपले स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाआवास ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्यासाठी कामाला गती देण्याच्या सूचना राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात बुधवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रालयातील महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर सर्व जिल्हाधिकारी ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.
इतर विभागांच्या अडचणी दूर करा
महाआवास व पंतप्रधान आवास योजनाची अंमलबजावणी करताना इतर विभागाच्या अडचणी येतात. त्या तात्काळ दूर करा. तसेच योजनेला गती देण्यासाठी कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावा, तसेच प्रत्येक आठवड्याला तालुका पातळीवर आढावा बैठक घ्या अशा सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी बैठकीदरम्यान दिल्या. तसेच घरकुलच्या जुन्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ देता येईल का, यावर अभ्यास करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. कारण अनेक घरकुलच्या जुन्या लाभार्थ्यांची घरे मोडकळीस आली आहे. मात्र काही नियमांमुळे त्यांना नवीन घरकुल मंजूर होत नाही. मात्र त्यात काही सुधारणा करून जुन्या घरकुल लाभार्थी लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.
मजुराच्या हाताला काम द्या मशीनला नाही
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही मजूरांच्या हाताला काम देण्यासाठी सुरू केली आहे. मात्र अनेक ठिकाणी यंत्राने काम करून पैसे उकळण्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य कारवाई केली पाहिजे. अन्यथा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिला.
गौण खनिज वसुली 100% करा!
महसुली वर्ष संपण्यास केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. मात्र अनेक विभागांची गौण खनिज आणि महसूल वसुली पाहिजे त्या प्रमाणात झालेली नसल्याने राज्यमंत्री सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील दोन महिन्यात उर्वरित वसुली करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
…………………….