औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच साकारणार जागतिक दर्जा चे शिवस्मारक व भीमतीर्थ महसूल राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन..

चालू घडामोडी मुंबई
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,मुंबई दि.17 डिसेंबर 2020

औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच साकारणार जागतिक दर्जाचे ‘शिवस्मारक’ अन ‘भीमतीर्थ’ !
जाणत्या राजाचा आणि महामानवाचा इतिहास जगासमोर यावा : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

अवघ्या राज्याचे आराध्य दैवत असलेल्या जाणत्या राजाचा इतिहास आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले महान कार्य जगासमोर यावे यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि ‘भीम तीर्थ’ उभारण्यासाठी आपला मानस असल्याचे प्रतिपादन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. स्मारक निर्मितीच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात सांगोपांग चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित तज्ज्ञांच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत पाटील, आमदार अंबादास दानवे, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अप्पर मुख्य राजगोपाल देवरा, औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, राजकीय व शासकीय धोरण आणि रणनीतीचे सल्लागार संतोष कराळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे कार्यकारी सदस्य सचिन मुळे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. नामदेवराव जाधव, शिरिष देशपांडे, इतिहास अभ्यासक प्रा.नितीन बाणगुडे पाटिल, दिग्दर्शक कार्तिक केंडे, शिल्पकार प्रमोद कांबळी, कॅलिग्राफर अच्युत पालव, आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील उपस्थित होते.
श्री. सत्तार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसरख्या वीर लढवय्याच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपुर्ण ठरणार आहे. महाराजांचे युद्धकौशल्य, सुराज्य, अष्टप्रधान मंत्रीमंडळ, त्यांची हस्तलिखीते, शस्त्रास्त्रे असे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जीवंत करणारे साहित्य एकाच ठिकाणी पर्यटकांना बघायला मिळणार आहे. तसेच आधुनिक भारताचा पाया रचणारे घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले महानकार्य जगाला कळावे त्यामुळे हे दोन्ही स्मारक सर्व दृष्टीने परिपुर्ण असावे यासाठी इतिहास संशोधक, लेखक, वास्तुकला, शिल्पकार तसेच या विषयातील सगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिली.

तीनही विभागांचे आभार …..
जाणत्या राजाचा इतिहास आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले महान कार्य जगासमोर यावे यासाठी स्मारक तयार करण्याचा मानस आहे. या पवित्र कामासाठी ग्रामविकास आणि सामाजिक न्याय विभाग प्रत्येकी २५ कोटींचा निधी तर पर्यटन विभागाने दोन्ही स्मारक प्रत्येकी दहा एकर जागेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे तत्वतः मान्यता दिली आहे. स्मारकाच्या या महान कार्यासाठी या तिन्ही विभागाने केलेल्या मदतीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी आभार मानले.
देखभाल दुरुस्तीच्या निधीसाठी प्रस्ताव…..
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या परिसरात फर्दापूर येथे हे दोन्ही स्मारक साकारणार आहेत. टप्प्या टप्प्यात तयार होणारे दोन्ही स्मारक प्रत्येकी दहा एकरच्या परिसरात उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २५ कोटी रुपये एवढा निधी लागणार आहे. या प्रकल्पांच्या भविष्यातील देखभाल दुरुस्तीसाठी खासगी संस्थांकडून सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत मिळणारा निधी वापरण्यात येईल, त्याच प्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या निधीतील १० टक्के निधी या कामासाठी राखून ठेवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.
उपस्थित मान्यवरांनी अनेक महत्वपुर्ण सूचना यावेळी केल्या. या स्मारकाच्या ठिकाणी दृकश्राव्य माध्यमाचा जास्तीत जास्त वापर व्हावा असे मत माजी राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी व्यक्त केले, शिवाजी महाराजांवरील साहित्याची अभ्यासिका असावी असे मत लेखक श्री. जाधव यांनी मांडले, मुर्तीकार श्री. कांबळे यांनी दगडी मुर्ती असावी असे सूचविले, प्रा. बाणगुडे पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या अचर्चित कार्यावरील शिल्पे उभारण्यावर भर द्यावा असे सांगितले, श्री. देशपांडे यांनी शिवाजी महाराजांवरील चित्रपट तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, खासदार डॉ. कोल्हे यांनी याच स्मारकाच्या धर्तीवर त्यांचा मतदार संघ जुन्नर येथे उभारण्यात येणा-या ‘शिवसंस्कार सृष्टी’ या प्रकल्पाचे दृकश्राव्य सादरीकरण यावेळी केले.

उपस्थित मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजाचा छोटेखानी सिंहासनारुढ पुतळा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातर्फे सप्रेम भेट म्हणून देण्यात आला.

असे असेल शिवस्मारक…..


• अजिंठा या जागतिक वारसा असलेल्या जगप्रसिद्ध लेण्यांच्या सभोवतालच्या फर्दापूर येथील परिसरात महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक
• बालपण , मावळ्यांची माहिती, किल्ल्यांची माहिती, अष्टप्रधान मंडळ यांची माहिती देणारे दालन
• स्मारक परिसरात महाराजांचा अश्वरुढ भव्य पुतळा
• अद्यावत ग्रंथालय, प्रशासनिक संदर्भाचे ग्रंथ, महाराजांची हस्त लिखीते, युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे यांचे प्रदर्शन
• महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपट दाखविण्यासाठी मुक्त आकाश रंगमंच (ॲम्फीथिएटर),3डी ऑडीयो व्हिज्युअल , लेझर शो.

असे असेल भीमतीर्थ…..


• अजिंठा या जागतिक वारसा असलेल्या जगप्रसिद्ध लेण्यांच्या सभोवतालच्या फर्दापूर येथील परिसरात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दहा एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिकृती
• लेसरशो द्वारे डॉ. आंबेड्करांचा जीवनपट दाखविला जाणार
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचे सर्व साहित्य, लिखाण, हस्तलिखित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *