बारामती,फलटण,महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या…
लोकहित न्यूज मुंबई दि 30/11/25
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येणार होता पण प्रचार वेळ सोमवार संध्याकाळी 10 पर्यंत दिली आहे. लगेच त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडेल. जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.
बारामती नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, ही प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद झाली होती. याशिवाय, उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काहीजणांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
महाबळेश्वर आणि फलटणनंतर बारामतीची निवडणूक देखील पुढे गेली आहे. निवडणूक आयोगाने तसे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहेत. त्याची अपिलाची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर रोज पर्यंत पुढे ढकलली आहे. साहजिकच नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने बारामतीचे नगरपरिषदेचे मतदान थेट 20 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
या नव्या प्रक्रियेनुसार 4 डिसेंबर रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 10 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्याचा व अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 11 डिसेंबर 2025 रोजी जारी केली जाणार असून 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल होणार आहे. नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.





