लोकहित न्यूज,मंञालय ,मुंबई दि.9 डिसेंबर 2020
बाबा हाजी अली दर्ग्याच्या लवकरच होणार ‘कायाकल्प’!
दर्ग्याच्या नूतनीकरण आणि सौंदरीकरणासाठी राज्यमंत्री सत्तारांनी कंबर कसली
वरळीतील हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबा हाजी अली दर्ग्याला देशातील प्रथम क्रमांकाचे धार्मिक स्थळ बनवण्याचे वचन राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. येत्या काही महिन्यात दर्गा आणि परिसराचे नूतनीकरण आणि सौंदरीकरण करण्याची योजना आहे. काही दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन राज्यमंत्री सत्तार यांनी दिले. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत कामाला गती देण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ १४३१ मध्ये दर्गा बनविण्यात आल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले. या दर्ग्याला मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी विशेष धार्मिक महत्त्व आहे. हे मुंबईचे एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. नवस पूर्ण करणारे जगभरातील भाविकांच्या मनात दर्ग्याच्या नूतनीकरण आणि सौंदरीकरच्या यासंदर्भात उत्सुकता आहे.
निधी मंजूरसाठी प्रयत्न…..
मुंबईतील श्रध्दास्थान असलेल्या बाबा दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच सर्व भाविकांना सोयी, सुविधा पुरविण्यासाठी शासनातर्फे विशेष निधी देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री सत्तार यांनी दिली.
लवकरच होणार कामाला सुरुवात….
बाबा दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत प्रकल्प व्यवस्थापन नेमून लवकरच आराखडा तयार करण्याचे आदेश राज्यमंत्री सत्तार यांनी दिले आहेत.
अशा प्रकारे केले जातील बदल…..
बाबा हाजी आली दर्गा आणि परिसराचे नूतनीकरण आणि सौंदरीकरण करताना पार्किंग व्यवस्थापन, गर्दीचे व्यवस्थापन, अस्तित्वातील पायवाटेच्या सुधारणा, तसेच मुख्य रस्त्यावर भव्य-दिव्य बुलंद दरवाजे बांधले जाणार आहे. विविध फुलांच्या झाडांनी सुशोभित असलेल्या मुगल गार्डनचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मुगल गार्डनमध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारी बेंच बसविली जाणार आहेत. दर्ग्याच्या सौंदरीकरणात भर टाकण्या करीत अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था (लायटींग) बसविली जाणार आहे. भाविकांसाठी विशेष सोयी, सुविधांनीयुक्त व्हिजिटर प्लाझा बांधण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यापासून दर्गा पर्यंत जाणाऱ्या मार्गातील अतिक्रमण तसेच सभोवतालची सर्व अतिक्रमणे हटविली जाणार आहेत.