परभणी प्रतिनिधी दि.27
मराठवाडा पदवीधर निवडणूक मतदार संघ महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देण्याचा संकल्प करा असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
शुक्रवार ( दि.27 ) रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथील आ.सुरेश वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभेत पदाधिकारी, पदवीधर मतदारांना संबोधित करताना ते बोलत होते .यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, खा. संजय जाधव, आ.सुरेशराव वरपूडकर ,आ. राहुल पाटील,उपमहापौर भगवानराव वाघमारे ,सभापती रामभाऊ आप्पा घाडगे ,स्वराज सिंग परिहार, प्रा तुकाराम साठे,रंजीत काकडे,सुहास पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, निवडणुकीत प्रत्येक मताचे मोठे मूल्य असते. त्यात पदवीधरांच्या निवडणुकीत मताचे मोल आणखीनच वाढते. त्यामुळे प्रत्येक मत करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले. तसेच मतदान हे बाद होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले .
खोटे बोलण्या मध्ये भाजप नेत्यांचा विक्रम
आपण अनेक विक्रम बघितले असतील पण खोटे बोलण्याचा शर्यतीत भाजपच्या नेत्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्यांचा एकच ध्येय आहे खोटे बोला पण रेटून बोला त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणत्या वक्तव्यावर विश्वास ठेवू नका असा टोला यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला . भाजपचे सरकार दोन महिन्यानंतर नव्हे तर पुढील दोनशे महिन्यानंतर ही येणार नसल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
भाजपने दहा तोंडाचे रावण तयार केले – माजी मंत्री खोतकर
भाजपमध्ये पाताळयंत्री लोक आहेत. दोन समाजात ,दोन धर्मात तेढ निर्माण करणे चे काम आजपर्यंत भाजपने केली आहे . त्यासाठी त्यांनी समाजात दहा तोंडाची रावण तयार केल्याची टीका माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी केली. भाजपने गलिच्छ राजकारण करून देश चुकीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याने चुकूनही भाजपच्या बाजूने निर्णय घेतला तर देश रसातळाला जाईल. त्यामुळे लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांना रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मताने निवडून आणण्याचे आव्हान माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी केले.